भाजपाचा ‘हा’ नेता उमेदवारी न मिळाल्याने लढणार अपक्ष

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी भाजपा पाठोपाठ शिवसेनेकडूनही उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन अखेर बंडाचे निशाण फडकावले आहे. कोकाटेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयार केल्याचे समजत आहे. दोन दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ते आपली उमेदवार जाहीर करणार आहेत. कोकाटेंच्या उमेदवारींमुळे युतीच्या उमेदवारीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

आपल्याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु शिवसेनेने मात्र विद्यमान खासदार गोडसे यांनाच उमेदवारी दिल्याने कोकाटे यांनी आता अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोकाटे यांनी मतदारांसह आपल्या समर्थकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपा युती होण्यापूर्वी कोकाटे यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले होते. परंतु युतीनंतर मात्र आता चित्र बदलले आणि कोकाटे यांची कोंडी झाली. यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांना सबुरीचा सल्ला दिला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नही केले. परंतु याचा काही उपयोग झाला नाही. कोकाटेंच्या उमेदवारीच्या सर्व आशा मावळल्यानंतर कोकाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांनीच शिवसेना उमेदवारासमोर बंडाचा झेंडा फडकावल्याने नाशिकची निवडणूक चुरशीची होणार आहे हे मात्र नक्की.