पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचा नवा डाव ; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा पक्षप्रवेश निश्चित

पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुकांआधीच राजकारणात खळबळ उडाली आहे. तर प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती हे भाजपाच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या ७ मार्च रोजी मिथुन चक्रवर्ती हे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती पुढं आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची मुंबईत भेट घेतली होती.

दरम्यान, मागच्या वर्षी नागपूरमध्ये मिथून चक्रवर्ती यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती, त्यावेळी भागवत यांना मिथुन यांनी घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत झालेली ही भेट खूप महत्त्वपूर्ण ठरली असल्याचं समोर आले आहे. यावरून येथील विधानसभा निवडणुकीत भाजप एका प्रसिद्ध चेहऱ्याच्या शोधात होती, मात्र मिथून चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसमधून पश्चिम बंगालकडून राज्यसभेत खासदार राहिले आहेत. परंतु त्यांना राजकारणात रस नसल्याचं दिसत होतं. नंतर शपथ घेतल्यानंतर काही दिवसांत त्यांनी खासदार पदाचा राजीनामा दिला होता.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी भाषणात तेथील जनतेला परिवर्तन हवं असल्याचं सांगितलं होतं. पश्चिम बंगाल राज्यातील हिंदू मतपेटीसाठी भाजपकडून नवे प्रयत्न सुरु केले जात आहे. त्यात आता मिथून चक्रवर्ती यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपला किती फायदा होणार, हे महत्वाचं ठरणार आहे.