गांधी विरूद्ध गांधी : भाजपची नवी रणनिती

लखनौ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीत गांधी विरूद्ध गांधी असा सामना पहायला मिळू शकतो. कारण आता भाजपकडून गांधी परिवाराला लक्ष करण्यासाठी भाजपमधील गांधी परिवाराचा वापर करण्याची रणनिती वापरली जाणार आहे. सध्या प्रियंका गांधी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर नरेंद्र मोदींना लक्ष करण्यात येत आहे. त्याचबरोबर राहुल तसेच सोनिया गांधी देखिल भाजपवर वेळोवेळी निशाणा साधत आहेत. त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपकडून ही रणनिती वापरली जाणार आहे.

आता काँग्रेसविरोधात गांधी घराण्याच्या सूनबाई मनेका गांधी यांना पुढे करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या भाजप कोअर कमिटी़च्या बैठक हा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बोलावण्यात आली होती. या बैठकीला मनेका गांधी देखील हजर होत्या. या बैठकीमध्ये मनेका गांधी यांच्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका आणि सोनिया गांधी यांच्याकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याची जबाबदारी असणार आहे.

मुख्यतः उत्तरप्रदेशमध्ये प्रियंका गांधी मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेत आहेत. त्यामध्ये त्या थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करतांना दिसत आहेत. त्याचबरोबर भाजप नेत्यांवर गांधी परिवाराकडून कडाडून आरोप केले जात आहेत. त्या आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी भाजप मनेका गांधी यांना मैदानात उतरवणार आहे. येथील लोकांमध्ये गांधी परिवाराबद्दल असलेली लोकप्रियता लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.

गांधी परिवारांच्या आरोपांना मनेका यांनीच उत्तर दिले तर योग्य संदेश जाईल असे भाजप नेत्यांचे मत आहे. त्यासाठी पक्षाकडून उत्तर प्रदेशात मनेका गांधींच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मनेका गांधी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवल्यास सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना बचाव करणे कठीण जाईल, गांधी कुटुंबातीलच असल्याने मनेका गांधी यांचे म्हणणे लोकांना अधिक प्रभावीपणे पटू शकेल असं भाजपमध्ये नेत्यांना वाटत आहे.