विरोधी पक्षनेत्यालाच भाजपमंत्र्याची ऑफर

अहमदनगर: पोलिसनामा ऑनलाईन – नगर येथील आदर्श गोपालक व प्रगतशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना सोमवारी सायंकाळीच्या कार्यक्रमात भाजप प्रवेशाची ऑफर दिली. उपरोधिकपणे बोलताना ते म्हणाले की, ‘तुम्ही युतीच्या काळात  कृषिमंत्री होतात. परत येणार असाल, तर आम्ही विचार करू.’ शिंदे यांनी ऑफर देताच कार्यक्रमात एकच हशा पिकला. या कार्यक्रमात प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.

विखेंनी त्यांच्या भाषणात ते कृषीमंत्री असतानाचे काही प्रसंग कथन केले. तसेच जुन्यांना (काँग्रेस पक्ष) चांगले दिवस येणार आहेत, असे विधान केले. विखे यांनी कृषि मंत्री पदावर असतानाचे अनुभव सांगितल्याचा धागा पकडून जलसंधारण मंत्री शिंदे हे त्यांच्या भाषणात म्हणाले की, ‘तुम्हाला कृषिमंत्रिपद युती सरकारच्याच काळात मिळाले होते. पुन्हा युतीचे सरकार येणार असल्याची जाणीव तुम्हाला  झाली असून, तुम्ही परत येणार असाल तर आम्ही विचार करू.’

जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे या पालकमंत्री शिंदे यांना उद्देशून म्हणाल्या की, आम्ही तुमच्याकडे एकतर काही मागत नाही. आणि मागितलेच तरी भेटत नाही. मागितलेलेही आम्हाला कोर्टात जाऊन मिळवावे लागते.

राम शिंदे म्हणाले, ‘मला वाटलं विरोधीपक्ष नेत्यांच्या बोलण्यात दोनदा, तीनदा ‘वाण’ आलं. थोरात साहेबांच्या साक्षीने सांगतो. विखे पाटलांकडे अनेक खाते होते. त्यांना मात्र कृषी खात्याची आपुलकी होती. तुम्हाला माहित असेल कृषी खाते कधी होतं त्यांच्याकडं? युतीच्या काळात. युती सरकार पुन्हा येणार याची त्यांना जाणीव झाली आहे’, असे म्हणत शिंदेंनी विखेंची फिरकी घेतली.

थोरातांनी धुडकावली ऑफर

पालकमंत्र्यांनी दिलेल्या ऑफरवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘कडी’ केली. ‘अनेक खात्यांचा कारभार असल्याने राम शिंदेंना विखेंचे वक्तव्य नीट लक्षात आले नाही. जुनं ते सोन म्हणजे काही 1997- 98 चे पक्ष नाही. तर 133 वर्षांची परंपरा असलेला पक्ष असे विखेंना म्हणायचे होते’, असे सांगत राम शिंदेंनी दिलेल्या ऑफरला धुडकावून लावले.

आता सहलीला निघा…

पालकमंत्री राम शिंदे यांनी पुढच्या वर्षी पुरस्कारप्राप्त शेतकर्‍यांसाठी सहलीचे नियोजन करु, असे जाहीर केले. तोच धागा पकडून माजी मंत्री थोरात यांनी गत पाच वर्षापासून आम्ही सहलीवर आहोत, आता तुमची वेळ आली असून, आपण आलटून-पालटून सहलीला जाऊ, असे सूचक विधान करून युती सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा टोला लगावला.