भाजपाला जोरदार धक्का ! एक कॉल अन् ‘ऑपरेशन लोटस’ फेल

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य प्रदेश मधील आमचे सरकार सुरक्षित असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. कमलनाथ सरकारमधील ६ नाराज आमदार माघारी आले असून, ४ आमदार अजूनही बेपत्ता आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीआधी कमलनाथ सरकार पाडण्यासाठी सुरु केलेले भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी होण्याआधीच फसले आहे. ही योजना फसण्याचे कारण म्हणजे एका आमदाराने केलेला ‘फोन कॉल’ असल्याचे बोलले जात आहे.

कमलनाथ सरकारवर नाराज असणाऱ्या आमदारांना चार्टर्ड विमानाने मंगळवारी दिल्लीला नेण्यात आले, त्याचवेळी एका आमदाराने फोन केल्यामुळे सर्व आमदार दिल्लीत राहणार असल्याची बातमी फुटली. राज्य सरकारला पाठिंबा देणारे १२ आमदार दिल्लीत पोहोचणे अपेक्षित होते, त्यापैकी १० जण दिल्लीत दाखल सुद्धा झाले होते. ही बातमी फुटताच काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी आणि जयवर्धन सिंह तातडीने दिल्लीकडे निघाले.

१० आमदार जर फुटून भाजपाकडे आले असते तर, राज्यसभेच्या निवडणुकीआधीच कमलनाथ सरकार कोसळले असते. त्या दिवशी काँग्रेसचे आमदार भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची भेट घेणार होते. दिल्लीत दोन ठिकाणी आणि बंगळुरूमध्ये एका ठिकाणी आमदारांना ठेवण्यात येणार होते. बंगळुरूमधील आमदारांच्या मुक्कामाची तयारी करण्याचे काम हे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे चिरंजीव विजयेंद्र यांच्याजवळ होती.

भाजपातर्फे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, हे कळताच काँग्रेसने आपल्या १४४ आमदारांना व्हीप बजावला आणि व्हीप न पाळल्यास त्या आमदाराचे विधासभेतील सदस्यत्व रद्द होईल आणि विरोधात मतदान झाल्यास त्याची किंमत आमदारांना भोगावी लागेल, असे संसदीय कार्यमंत्री गोविंदसिंह यांनी व्हीप जारी करतानाच सांगितले.