पुण्यातील भाजपचे ‘कारभारी’ बदलणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. शहराध्यक्षांपासून हे बदल केले जाणार असल्याची दाट शक्यता भाजपच्या गोटातून वर्तविण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाल्याने शहरातील भाजपमधील अंतर्गत राजकारणाला आता पूर्णविराम तसेच पदांपासून उपेक्षित असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीला जेमतेम कालावधी राहिलेला असताना आता भारतीय जनता पार्टीने चोख नियोजनास सुरुवात केली आहे. वरकरणी एकत्र असणाऱ्या पुणे भाजपमध्ये छुपे गटा -तटाचे ‘टेबल’ आहेत. त्यातूनच कुणाला खिंडीत गाठायचे कुणाला जेरीस आणायचे हे राजकारण दिवसेंदिवस पेटत आहे. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. त्यात प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाली आहे.

त्यामुळे आठही विधानसभा मतदारसंघात भाजपाची ताकद आणखी वाढविण्यासाठी कृतीआराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय विद्यमान आमदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’ ही तपासले जाणार आहेत. पक्षात अंतर्गत असलेली गटबाजी मोडून काढण्यासाठी वेळप्रसंगी कडक कारवाईचा पवित्रा पक्षश्रेष्ठीकडून घेतला जाणार असल्याचा इशाराही देण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्षपदी नवी व्यक्ती आली कि फेरबदल होतात,असे वरकरणी सांगितले जात असले तरी माजी प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वी पुण्यातील काही पदाधिकारी यांच्याबाबत केलेल्या विधानांमुळे नाराजी पसरली होती.

त्यातही पक्षासाठी अनेक वर्षे कार्य करूनही उपेक्षित राहणाऱ्यांची कोंडी झाली होती ; पण आता त्यांना दिलासा दिला जाणार आहे आणि त्यातून पुण्यात पक्ष एकसंध ठेवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. शहराध्यक्ष पदासाठी मुख्यमंत्र्यांशी निकटचा संबंध असणाऱ्या पालिकेतील एका माजी पदाधिकाऱ्यासह अन्य एक तुल्यबळ व्यक्तिमत्व रिंगणात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे समाजनिहाय मतांचे समीकरण पाहूनच शहराध्यक्षपदासाठी नवा चेहरा दिला जाणार आहे. आधी कुणाची मक्तेदारी होती, ती पूर्णतः संपविण्यासाठी मुंबईतून दिलेल्या आदेशानुसार सर्व कार्यवाही सुरु झाली आहे. कुणाला आमदारकीचे तिकीट द्यायचे हेही आधीच ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यात तीन विद्यमानांना घरचा रस्ता दाखविला जाणार आहे. तर उर्वरित पाच जणांपैकी केवळ दोन विद्यमानांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याचेही बोलले जात आहे. जागावाटपात शिवसेनेला किती याचा फैसला अद्याप झालेला नसला तरी खडकवासला मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येणार आहे. कुणाची कोणतीही ‘शिफारस’ न स्वीकारता पक्षासाठी एकनिष्ठ आणि अनेक वर्षे योगदान देणाऱ्यांची यादी भाजपने पर्यायाने मुख्यमंत्र्यांनी तयार केली आहे. राज्यात सर्वत्र केलेल्या गोपनीय सर्वेनुसार जुन्यांना ; पण आजवर उपेक्षित असलेल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याची रणनीती ठरविण्यात आली आहे आणि अशा जुन्याजाणत्यांना उमेदवारी देण्याबाबत ठोस निर्णय होणार आहे.