नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मजबूत सरकारचा भाजपा – शिवसेना युतीचा निर्धार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ( शाहरुख मुलाणी ) – देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भक्कम सरकार सत्तेवर आणण्याचा निर्धार शुक्रवारी नागपूर येथे भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला.

शिवसेवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा शिवसेनेने खुल्या दिलाने युती केली आहे. दोन कडवट हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राने हिंदुस्थानला नवी चेतना दिली आहे. हिंदुत्वाचा आवाज बुलंद झाला आहे. आता महाराष्ट्रातील सर्व 48 जागा युतीला जिंकाव्या लागतील. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात परिवर्तन केले आहे.

या सरकारने गरिबी निर्मूलनाचे काम प्रामाणिकपणे केले आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि रोजगार अशा प्रत्येक क्षेत्रात गरीबांच्या जीवनात परिवर्तन करणारे काम केले आहे. प्रत्येक भारतीयासाठी आश्वासक काम केले आहे. विरोधकांकडे या सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी काही मुद्दाच नाही. विरोधकांचे एकेक नेते निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आहेत. भाजपा शिवसेना युती ही विचारांच्या आधारावर झालेली युती आहे. या युतीच्या माध्यमातून पुन्हा देशात मोदींच्या नेतृत्वाखाली बलशाली भारतासाठी मजबूत सरकार निर्माण करायचे आहे. दरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामामुळे विरोधक विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करू शकत नाहीत व ते हताश झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस जातीयतेचे विष कालवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत सरकारने केलेले काम हा ट्रेलर असून अजून फिल्म बाकी आहे.

देशाचे भविष्य घडविण्याकरता गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा यावेळी महाराष्ट्रात जिंकायच्या आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, गेली पाच वर्षे केंद्रात व राज्यात भाजपा शिवसेना सरकारने चांगली कामगिरी केली आहे. या कामाच्या जोरावर लोकसभा निवडणूक लढवायची आहे. काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नसल्याने ते हा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करतात पण निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला हवी. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील. अशा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर, खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, अशोक नेते तसेच भाजपा शिवसेना युतीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. नागपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी अमरावती येथे भाजपा शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत झाला.