सरकारी कर्मचारी ऐकत नसतील तर त्यांना बांबूचे फटके मारा, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा सल्ला (व्हिडीओ)

पटना : वृत्त संस्था – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आपल्या वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी केलेले आणखी एक विधान सध्या चर्चेत आहे. त्यावर सध्या उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. गिरीराज सिंह यांनी काम न करणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोकळ बांबूचे फटके द्या, असे विधान केले आहे. शनिवारी बिहारच्या बेगूसराय येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते.

सरकारी अधिकारी वारंवार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात. सामान्य नागरिकांकडून अशा तक्रारी वारंवार त्यांच्याकडे केल्या जातात, यावर बोलताना त्यांनी संवेदनहीन असलेल्या अधिकाऱ्यांना बांबूच्या काठीने मारण्याचा सल्ला दिला. गिरीराज सिंह म्हणाले, याने जर समस्या सुटल्या नाहीत तर मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. गिरीराज सिंह यांनी म्हटले की, लोकशाहीमध्ये खासदार, कलेक्टर, एसपी, एसडीओ आणि असे सगळेच जनतेला उत्तरदायी आहेत.

जर कुणी व्यक्ती आपल्या जबाबदारीपासून पळ काढत असेल, तर त्याला पोकळ बांबूचे फटके द्या. त्यांनी पुढे म्हटले की, जनता हीच सर्वोच्च आहे. जर कुणी सरकारी व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून पळ काढत असेल तर तुम्हा लोकांना त्याला वठणीवर आणण्याचा अधिकार आहे. जर आपण एखाद्या बेजबाबदार अधिकाऱ्याच्या विरोधात काही कारवाई करत असाल, तर गिरीराज सिंह तुमच्यासोबत आहे.