भाजमुयो नेत्याचा गोळ्या घालून खून, राजकीय वैमनस्यातून खून झाल्याची चर्चा

बेगूसराय : वृत्तसंस्था –  बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यात भारतीय युवा मोर्चाचे नेते धीरज कुमार यांची गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरांनी आणखी तीन जणांना गोळ्या घातल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. ही घटना मथिनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैथमा परिसरात रविवारी (दि.17) सकाळी घडली आहे.

घटनेसंदर्भात असे सांगितले जात आहे की, रविवारी सकाळी भाजप नेते धीरज भारद्वाज आपल्या घराबाहेर उभे होते. ते त्याठीकाणी आलेल्या काही लोकांसोबत बोल होते. त्यावेळी दुचाकीवरून तोंडाला मास्क लावून आलेल्या तीन जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये धिरज यांना पाच गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या जोडीदाराला दोन गोळ्या लागल्या. दरम्यान हल्लेखोर गोळीबार करत असताना तेथून दुध घेऊन जात असलेल्या युवकावरही गोळ्या झाडल्या. हल्लेखोर तेथून पळून जाताना हवेत बुंदुका फिरवत निघून गेले.

निवडणुकीच्या रागातून खून झाल्याचा संशय

दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेबाबत कुटुंबातील व्यक्ती काहीच बोलले नाहीत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या रागातूनच हे कृत्य केले असावे. काही दिवसांनी महापालिकेची निवडणूक होणार आहे. ही निवडणुक धिरजदेखील लढवणार आहे. यापूर्वी देखील त्याने निवडणूका लढवल्या आहेत. परंतु कमी फरकाने त्यांचा पराभव झाला होता. गुन्हेगारांची ओळख पटली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असून तिघांना अटक करण्यात आली आहे.