अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगस ‘महामारी’ म्हणून घोषित, जाणून घ्या केव्हा, कशी आणि का केली जाते ही घोषणा?

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सामना लोक करत असतानाच ब्लॅक फंगस म्हणजे म्यूकरमायकोसिसचा धोका समोर आला आहे. अनेक राज्यांनी या फंगल इन्फेक्शनला महामारी घोषित केले आहे. कोणत्या स्थितीत एखाद्या आजाराला महामारी घोषित केले जाते, याच्या पाठीमागे कोणती कारणे असतात, एखादी महामारी म्हणजे एपिडेमिक नंतर पॅनडेमिक म्हणजे जागतिक महामारी केव्हा घोषित केली जाते? याचा फायदा काय होतो? याबाबत जाणून घेवूयात…

महामारी म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार जेव्हा एखादा आजार संसर्गाद्वारे मोठ्या संख्येला प्रभावित करतो आणि नंतर याचा प्रकोप सामान्यपेक्षा जास्त होतो तेव्हा त्यास महामारी घोषित केले जाते. हा आजार जोपर्यंत एखादे स्थान, क्षेत्र किंवा लोकसंख्येच्या भूभागापर्यंत मर्यादित असतो, तेव्हा तो महामारीच्या श्रेणीत असतो. एखादा आजार महामारी होण्याची घोषणा ही त्यामुळे होणारे मृत्यू आणि पीडितांच्या संख्येवर सुद्धा अवलंबून असते.

पॅनडेमिक कशाला म्हणतात
तुम्ही ऐकले असेल की कोरोनाला पॅनडेमिक सुद्धा म्हटले जाते. पॅनडेमिक म्हणजे जागतिक महामारी. जागतिक महामारी तेव्हा घोषित केली जाते जेव्हा एखादा आजार एकापेक्षा जास्त देशांत आणि दुसर्‍या खंडांमध्ये सुद्धा पसरतो. एकाच वेळी जगाच्या विविध देशांमध्ये लोकांमध्ये आजार पसरत असेल तर यास पॅनडेमिक घोषित केले जाते. डब्ल्यूएचओने कोरोनाला पॅनडेमिक यासाठीच घोषित केले होते.

खुप विचारपूर्वक ही घोषणा केली जाते. ही खुप कठिण प्रक्रिया असते कारण यामुळे जगात भीतीचे वातावरण पसरते. लोक भीतीने स्थलांतर करू लागतात. अशा पलायनामुळे संसर्ग आणखी वाढू शकतो. इतरही अनेक गोष्टींवर परिणाम होतो.

महामारी घोषित करण्यामागील कारणे
जेव्हा एखादे राज्य किंवा देशात एखादी महामारी घोषित केली जाते तेव्हा पाठीमागे अनेक कारण असतात. महामारी घोषित होताच सरकारे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना अलर्ट मोडवर येतात.

ब्लॅक फंगसचा महामारी अंतर्गत समावेश करा
कोरोनाच्या संकटातच अनेक राज्यात ब्लॅक फंगस आजाराचे रूग्ण वाढत चालले आहेत. केवळ राजस्थानमध्येच ब्लॅक फंगसच्या 700 जास्त केस आहेत. राजस्थानमध्ये ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. येथे 100 पेक्षा जास्त रूग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहिले आहे की, ब्लॅक फंगसचा महामारी अंतर्गत समावेश करा, सोबत याच्याशी संबंधीत प्रत्येक गोष्टीचा रिपोर्ट केला जावा. केंद्राने आयसीएमआर आणि आरोग्य केंद्राद्वारे गाईडलाईनचे पालन करण्यास सांगितले आहे.

राजस्थानसह महाराष्ट्रात सुद्धा आतापर्यंत या आजाराने 90 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली सारख्या राज्यांमध्ये सुद्धा ब्लॅक फंगसचे रूग्ण सापडत आहेत. महाराष्ट्रात सुमारे दोन हजारपेक्षा जास्त केस नोंदल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राने केंद्राला विनंती केली आहे की, ताबडतोब औषधांचा पुरवठा करावा. बारामतीमध्ये म्युकरमायकोसिस तपासणी कॅम्प लावण्यात आला होता, जिथे 400 लोकांची तपासणी झाली ज्यांच्यापैकी 16 लोक संक्रमित आढळले, यावरून या आजाराचा अंदाज येतो.