लोणावळ्यातील धक्कादायक घटना ! काळ्या बाहुल्यांवर शेतकरी अन् व्यवसायिकांचे फोटो लावून ‘जादूटोणा’

लोणावळा : वृत्तसंस्था – काळ्या बाहुल्यांवर प्रगतशील शेतकरी आणि व्यवसायिकांचे फोटो लावून लिंबू, खिळे, बिबा, टाचणी मारून झाडाला ठोकल्याचा अजब प्रकार लोणावळा ग्रामीण परिसरात उघडकीस आला आहे. याविरोधात संबंधित नऊ जणांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

लोणावळा ग्रामीण येथील तुंग परिसरातील इसार हायस्कूलजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर काळ्या बाहुलीवर फोटो त्यावर लिंबू आणि बिबा लावून पुन्हा लिंबू लावत टाचण्या, खिळ्याने ते झाडाला ठोकले आहेत. लाल कपड्यात नारळाने भरलेले गाठोडे देखील झाडाला बांधलेले आहे. जादूटोणा करण्यासाठी पांडुरंग कृष्णा जांभुळकर, संदीप एकनाथ पाठोर, संजय धोंडू कोकरे, किसन बंडू ठोंबरे, योगेश श्रीराम घाडगे, संतोष कोंडीबा घारे, अजय कुमार मेहता, कैवशर शेख, मनोज सेनानी यांचे फोटो वापरण्यात आलेले आढळले आहे. या अजब प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

या संबंधित नऊ जणांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीत पोलिसांकडे करण्यात आली आहे.