फोडणी देताना आधी ‘जिरे-मोहरी’च का टाकली जाते ? जाणून घ्या

पोलीसानाम ऑनलाइन – स्वयंपाक करताना जेव्हा आपण फोडणी देत असतो तेव्हा त्यावेळी फोडणीत आधी जिरे किंवा मोहरी टाकली जाते. नंतर कांदा वगैरे इतर पदार्थ टाकले जातात. परंतु आधीच मोहरी किंवा जिरेच का असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का ? आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

मोहरी किंवा जिरे तेलात फुटण्यासाठी योग्य तापमान लागतं. मोहरी तेलात फुटून त्यातलं तेल फोडणीच्या तेलात मिसळतं आणि फोडणीला खमंग वास येतो. कांदा आणि टोमॅटो नंतर जिरे किंवा मोहरी टाकली तर तापमान कमीच राहिल आणि मोहरी फुटणार नाही. त्यामुळं अशी मोहरी जेवताना दाताखाली येते आणि थोडा तिखटपणा आणि कडवटपणा लागतो. यामुळं चव बिघडते. म्हणून तेलात आधी जिरे किंवा मोहरी टाकली जाते.

असेही काही पदार्थ आहे ज्यात कच्च्या मोहरीचा तिखटपणा वापरला जातो. उदाहरणार्थ कोबीच्या कोशिंबिरीत मोहरी थोडी वाटून लिंबू आणि तेलात फेसून घालतात. आवळ्याच्या ताज्या लोणच्याला मोहरीपूड दह्यात फेसून घालतात. त्याला मोहरी चढवणं असं म्हणतात. पण वरून तडतडलेल्या मोहरीचीच फोडणी देतात. इतर लोणच्यांना मोहरीपूड किंवा मोहरी डाळ थोड्या गरम तेलात (कडकडीत) घालून फेसून घालतात. मोहरी अशा तीन वेगळ्या तापमानात वेगवेगळा स्वाद देते.