लठ्ठपणा, कर्करोग, मधुमेह, तणाव आणि हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी ‘काळ्या गव्हाचा’ ट्रेंड 

इंदूर : वृत्तसंस्था – शेतीमध्ये सुद्धा सध्या वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. जम्बो पेरू, बियाविरहित कलिंगड, ऑरगॅनिक फळफळावळ आणि भाज्या तसेच आता यात आणखी भर म्हणून काळ्या गव्हाचा ट्रेंड येऊ लागला आहे. हा गहू लठ्ठपणा, कर्करोग, मधुमेह, तणाव आणि हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी मदत करतो, असा संशोधकांचा दावा आहे.

मध्यप्रदेशात प्रथमच देपालपूरजवळील शाहपुरा नावाच्या गावातील शेतकरी सीताराम गहलोत काळ्या गव्हाची शेती करीत आहेत. हे वाण त्यांनी पंजाबच्या मोहाली येथील नॅशनल अ‍ॅग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधून आणले आहे. आपल्या शेतात ते ‘श्री विधी’ या तंत्राने काळ्या गव्हाची पेरणी करीत आहेत. या तंत्राच्या सहाय्याने त्याचे उत्पादन वाढते. या गव्हात सामान्य गव्हाच्या तुलनेत अधिक प्रमाणात रोगप्रतिकारक क्षमता असते.

गहलोत यांनी सांगितले की, या गव्हाचे वाण मिळवण्यासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून एनएबीआयकडे फेर्‍या मारत होतो. अद्यापही तेथील केंद्रात या गव्हाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यामुळे पेरणीसाठी तो मिळणे कठीण होते. मात्र, यावेळी त्यांनी मला तो दिला; पण तो केवळ पाच किलोच आहे. हा गहू शेतात ‘श्री विधी’ या तंत्राने पेरला आहे. या तंत्राच्या सहाय्याने त्याचे उत्पादन वाढते.

अ‍ॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सीच्या उपसंचालक शर्लिन थॉमस यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या गव्हाची श्री विधीने शेती केली तर उत्पादन क्षमता वाढते. ‘ब्लॅक व्हीट’ म्हणजेच काळा गहू शेतकर्‍यांना कमी प्रमाणात मिळतो. त्याची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी श्री विधीने शेती करणे गरजेचे आहे. या तंत्राचा दुसरा लाभ असा की, जोरदार वारे किंवा मुसळधार पाऊस यामुळे पिकांचे नुकसान होत नाही. या गव्हाबाबत मोहालीच्या नाबी केंद्रात 2010 पासून संशोधन सुरू आहे. पंजाबमध्ये त्याचे समर्थन मूल्य 3250 रुपये आहे.

काय आहेत काळ्या गव्हाचे फायदे –
१ ) काळ्या गव्हात सामान्य गव्हाच्या तुलनेत अधिक प्रमाणात रोगप्रतिकारक क्षमता असते.

२) सध्या लठ्ठपणा ही सर्व वयोगटातील लोकांसाठी मोठी समस्या बनली आहे. ह्या गव्हाच्या सेवनाने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
३) वातावरणातील बदलामुळे कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढला असून ह्या गव्हामध्ये कॅन्सर प्रतिबंधक घटक आहेत.
४) मधुमेह ह्या आजाराने लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत अनेक जण त्रस्त आहेत. ह्या गव्हामध्ये रक्तातील साखर प्रमाणात राहते .
५) धकाधकीची जीवनशैलीमुळे ताणतणाव आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे.  हा गहू तणाव आणि हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी मदत करतो.

काळ्या गव्हाच्या शेतीपुढील आव्हाने – 

१ ) या  गव्हाचे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
२ ) उत्पादन वाढीसाठी  हा गहू श्री विधी या तंत्राच्या सहाय्य्यनेच पेरावा लागतो.
३ ) नॅशनल अ‍ॅग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये  या गव्हाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यामुळे पेरणीसाठी
सहजासहजी तो मिळणे कठीण आहे.
४) या गव्हाचे  समर्थन मूल्य अधिक  आहे.