राजकीय विरोधकांकडून ब्लॅकमेलिंग: नगरसेवक वाकळे यांचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – माझ्या नगरसेवकपदावरील निवडीबाबत न्यायालयात याचिका दाखल करताना सादर केलेली कागदपत्रे बनावट आहेत. निवांत माझ्या राजकीय विरोधकांनी केवळ मला ब्लॅकमेल करण्यासाठीच न्यायालयात खोटी याचिका दाखल केली आहे, असा आरोप भाजपाचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

भाजपाकडून महापौरपदासाठी इच्छुक असलेले नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांच्या निवडीवर शिवसेनेचे पराभूत उमेदवार अर्जुन बाेरुडे यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात हरकत घेऊन त्यांचे पद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर वाकळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, मला असलेले तिसरे अपत्य वाळकी येथील रुग्णालयात जन्मलेले आहे. त्याबाबतचा जन्मदाखला ही माझ्याकडे उपलब्ध आहे. बाळाचा जन्म 2001 रोजी झालेला आहे. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य होण्यासाठी तिसर्या अपत्याचा नियम नव्हता. तिसरे अपत्याबाबत निघालेला शासकीय आदेश त्यानंतरचा आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना मी तिसर्या अपत्याबाबत रीतसर माहितीही नोंदवलेली आहे.

बोरुडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत माझे तिसरे अपत्य नगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात जन्माचा दाखला सादर केलेला आहे. हा दाखला पूर्णपणे बनावट आहे. मला ब्लॅकमेल करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच माजी सार्वजनिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे, असेही वाकळे म्हणाले.

प्रत्येक महापालिका निवडणुकीत विनाकारण माझ्याविरुद्ध विरोधकांकडून षड्यंत्र रचून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा चर्चेत आणलेला तिसर्या अपत्याचा विषयदेखील माझ्या विरोधातील राजकीय षडयंत्र आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण
भाजपाचो नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांना तिसरे अपत्य असल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, यासाठी शिवसेनेचे पराभूत उमेदवार अर्जुन बोरुडे यांनी नगर येथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 31 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. वाकळे हे भाजपाकडून महापौर पदासाठी चर्चेत आल्यानंतरच ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय शहरात चांगलाच चर्चेचा ठरला आहे.

बाबासाहेब वाकळे यांनी यापूर्वी अहमदनगर महानगर पालिकेत स्थायी समितीचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. अहमदनगर महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत अथवा सर्वाधिक जागा मिळालेल्या नसल्या, तरी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा व काही अपक्ष यांची एकत्रित आघाडी करून भाजपाचा महापौर करण्याच्या राजकीय हालचाली सुरू आहेत.