ठाण्याच्या सुशोभिकरणात ‘ते’ पोलीस निरीक्षक ‘दोषी’ ; ‘SP’ यांनी ठेवला ठपका, ‘HC’ मध्ये अहवाल सादर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर निधी जमवून पारनेर पोलिस ठाण्याचे सुशोभिकरण केल्याच्या प्रकरणात पारनेरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना पाठविला आहे.

याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केला आहे. त्यामुळे गाडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे.

खंडपीठाने अधीक्षक सिंधू यांना स्वत: खंडपीठात हजर राहून खुलासा करण्यास सांगितले होते. पोलीस अधीक्षकांनी याबाबत फेरचौकशी करून अहवाल सादर करण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार ३ मे रोजी फेरचौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. १३ जूनला फेरचौकशी अहवालावर सुनावणी झाली. निघोजचे सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद यांनी ही याचिका दाखल केली होती.

पारनेर पोलिस ठाणे व निघोज पोलीस चौकी नूतनीकरण, सुशोभिकरणासाठी सामान्य जनतेकडून साहित्य किंवा देणग्या स्वीकारण्याची परवानगी आवश्यक असताना ती घेतली नाही. स्वीकारलेले साहित्य व देणग्यांचा स्वतंत्र हिशोब, रोजकिर्द किंवा रेकॉर्ड ठेवले नाही. कोणत्याही प्रकारची वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी केलेले काम बेकायदेशीर आहे. कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर नागरी सेवा कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करणारा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविल्याचे अधीक्षक सिंधू यांनी खंडपीठास सांगितले.

एसपी सिंधू यांच्या अहवालावर समाधान व्यक्त करीत न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्या. के. के. सोनावणे यांनी ही याचिका निकाली काढली आहे. याचिकाकर्ते कवाद यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. अजिंक्य काळे, तर सरकारतर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे हे सध्या राहुरी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

सिने जगत –

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘फेमिना मिस इंडिया’चा ‘ताज’ राज्यस्थानच्या सुमन रावच्या डोक्यावर

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’