भ्रष्टाचारी, आंधळे-बहिरे सरकार उलथून टाकू – चव्हाण

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार जनताविरोधी निर्णय हुकूमशाही पद्धतीने राबवत आहे. अशा सर्वाधिक भ्रष्ट सरकारला व्यापारी, कष्टकरी, महिलांसह सर्वच वैतागले आहेत. त्यांच्या त्रासाची जाणीव नसलेले हे आंधळे बहिरे व हुकूमशाही सरकार उलथून टाकू. त्यासाठी रात्रीचा दिवस करून कामाला लागा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. येथील आचार्य आदिसागर मंगल कार्यालयातकाँग्रेसच्या व्हिजन 2011 कार्यकर्ता शिबिरामध्ये ते बोलत होते.

या कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतिक पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, आमदार शरद रणपिसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदींवर हल्ला

सध्या देशाची दिशा बदलणाऱ्या निवडणुकीची वाटचाल सुरू आहे. केंद्र राज्याचा एकूण चार वर्षांचा कारभार पाहता दोन्ही पातळ्यावर भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले असून, ‘न खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणारे मोदी सरकार भ्रष्टाचारात जगात नंबर वन बनले आहे. मोदींनी विमान खरेदीत 32 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. जी बुलेट ट्रेन फ्रान्स, चीनसह अन्य देश निम्म्या किंमतीत द्यायला तयार होते, त्यांचे प्रस्ताव डावलून जपानच्या 1 लाख 10 हजार कोटी रुपयांची बुलेट ट्रेन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादच्या हितासाठी महाराष्ट्रावर 50 हजार कोटी रुपयांचा वरवंटा फिरविला जात आहे. परदेशातील काळा पैसा परत आणतो, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. जनतेने त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. काळा पैसा असलेल्या 1400 भारतीय लोकांची यादी गेल्या चार वर्षांपासून मोदींजवळ पडून आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही. अशा एकाही बुडव्यावर मोदी सरकारने कारवाई केली नाही. देशातील सर्व बुडवे हे मोदी यांचे मित्र आहेत.त्यावर मोदी गप्पच आहेत. त्यामुळे इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार हे मोदींचे आहे. तरुणांना नोकर्‍या नाहीत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न जैसे-थे आहेत. जीएसटीमुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. परकीय गुंतवणूक आली नाही. तरुणांना नोकर्‍या नाहीत. उलट हुकूमशाही मोदी सरकार घटनेत बदल करत आहेत. त्यामुळे आता सरकारला हाकलून द्यावे असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.

हर्षवर्धन पाटलांची फडणवीसांवर टीका

हर्षवर्धन पाटील म्हणाले, भाजप सरकारने सत्तेवर येताना धनगर, मराठा, ओबीसींना आरक्षणे देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. मात्र आरक्षणाचा प्रश्‍न मिटला नाही. उलट जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजपच्या नेत्यांकडून सुरू आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न वाढत आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र मोडले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना शेती आणि शेतीतले काही कळतच नाही, त्यामुळे ते जनतेला काय न्याय देणार? महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे मंत्री भेटवस्तू वाटा, अशी आमिषे दाखवून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसून चालणार नाही. पक्ष व कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. महापालिका निवडणूक, पलूस-कडेगाव पोटनिवडणूक व भविष्यात होणार्‍या विधानसभा व लोकसभेसाठी मतभेद विसरून कामाला लागावे व नाकर्तेपणाचे सरकार जनतेतून हाकलून द्यावे असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

मोहन प्रकाश म्हणाले, काँग्रेस सरकारने शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविले. औद्योगिक विकास केला. देशाची प्रगती केली. मात्र भाजप सरकार केवळ विकासाच्या खोट्या गप्पा मारत आहे. दलितांवर अत्याचार होत आहेत. महिला सुरक्षित नाहीत. न्यायपालिका संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे. इंदिरा गांधींनी बँकिंग व्यवस्था मजबूत केली मात्र मोदी सरकारच्या काळात बँकेत भ्रष्टाचार करून उद्योजक देश सोडून पळून जात आहेत. तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशाच्या सीमेवर सैनिक लढताना शहीद होतात. त्याबाबतही त्यांना जाणीव नाही.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, महापौर हारुण शिकलगार, सभापती बसवेश्‍वर सातपुते, किशोर जामदार, यशवंत हाप्पे, प्रा. सिद्धार्थ सातपुते, संजय मेंढे, संतोष पाटील, राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.