तासगावमध्ये मंडल अधिकार्‍याला बेदम मारहाण

तासगाव : पोलीसनामा आॅनलाईन
तासगावमधील मंडल अधिकाऱ्याच्या गाडीला अडवून शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. उत्तम देवाप्पा कांबळे असे मारहाण झालेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी पहाटे वाळू उपसा करणारी पीकअप गाडी पकडली होती. ती गाडी तहसील कार्यालयाकडे घेऊन जात असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी तासगाव पोलिसांत रोहित ऊर्फ छोट्या तानाजी नलवडे, अमोल कांबळे व अन्य एक अनोळखी (सर्व रा. वरचे गल्ली, तासगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, गुरुवारी पहाटे खाडेवाडी येथे मंडल अधिकारी कांबळे हे गस्त घालत होते. त्यावेळी रोहित हा पीकअप गाडी (एमएच 10 बीआर 4984) मधून चोरून वाळू उपसा केल्याचे त्यांना दिसले. ही गाडी मंडल अधिकार्‍यांनी अडवून ताब्यात घेतली. यामध्ये अर्धा ब्रास वाळू होती. कांबळे ताब्यात घेतलेले पीकअप तहसील कार्यालयाकडे नेत होते. त्यावेळी अन्य दोघे आले आणि त्यांनी पीकअपच्या आडवी दुचाकी लावून गाडी अडवली. तसेच मंडल अधिकारी कांबळे यांना पीकअपमधून बाहेर ओढून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. पीकअप घेऊन त्यांनी पलायन केले. पुढील तपास हवालदार कुंभार करीत आहेत.