Wardha News : केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, 35 मजूर गंभीर जखमी – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथे असलेल्या उत्तम गाल्वा मटॅलिक लि. या कंपनीत केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला आहे. या स्फोटात 35 मजूर भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली. हा स्फोट आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास झाला.

कंपनीत स्फोट झाल्यानंतर कंपनीत काम करणारे 35 मजूर गंभीर रित्या भाजले आहेत. जखमी मजूरांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी मजूरांपैकी तीन मजूरांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या स्फोटामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या इतर मजूरांना दत्ता मेघे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्लास्ट फर्निशचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

उत्तम गाल्वा कंपनीत झालेल्या स्फोटाची चौकशी कामगार अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल, तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सांगितले.