सातारा जिल्ह्यात गावठी बॉम्बचा स्फोट ; एक गंभीर जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे गावातील जंगलात बंधार्‍याचे काम चालु असताना अचानकपणे गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळ दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
दादासो शामराव चव्हाण असे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. त्यास उपचारासाठी तात्काळ ग्रामणी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडाचे म्हसवेच्या जंगलातील बंधार्‍याचे काम चालु असताना अचानक बॉम्बचा स्फोट झाला. दगडाखाली असलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने कामावर उपस्थित असलेल्या मजुरांची भंबेरी उडाली. या घटनेत चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, काम चालु असताना गावठी बॉम्ब तेथे कोणी आणि कशासाठी आणला याबाबत चर्चा सुरू आहे. परिसरात आणखी काही ठिकाणी गावठी बॉम्ब असण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. गावठी बॉम्बच्या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.