चीनमध्ये केमिकल प्लांटमध्ये आग ; २२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू 

बीजिंग : वृत्तसंस्था – चीनमध्ये एका केमिकल प्लांटमध्ये स्फोट होऊन  २२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून २२ लोक जखमी झाले आहे. चीनमधील उत्तरेकडील हेबेई प्रांतातील झांगजीकौ शहरातील ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
या स्फोटात आणखी काही लोक जखमी झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशामन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या असून स्फोटामुळे लागलेली आग विझवण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. केमिकलचा स्फोट झाल्यानंतर प्लांटमधील ३८ ट्रक आणि १२ कारगाड्यांना आग लागली आहे. या ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
या घटनेपूर्वी २४ नोव्हेंबर रोजीही चीनच्या ईशान्य भागातील जिलीन प्रांतात असाच एका वेअर हाऊसमध्ये भीषण स्फोट झाला होता. यामध्ये २ जण ठार झाले होते तर ५७ जण जखमी झाले होते. हा स्फोटही इतका भीषण होता की स्फोटानंतर ३७० घरांचे नुकसान झाले होते तर १५ घरं कोसळली होती.