पिंपरी-चिंचवडमध्ये दृष्टीहीन रीना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलीस आयुक्त !

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलिसांच्या संकल्पनेतून दृष्टीहीन असलेल्या रीना पाटील यांना एक दिवसासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला तर ज्योती माने यांना अप्पर पोलीस आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला. या दोघींना दिलेल्या विशेष सन्मानाने त्या भारावून गेल्या होत्या.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी रीना पाटील यांना आपल्या खुर्चीत बसवून त्यांना सॅल्युट केला. तसेच पतीचं निधन झाल्यानंतर जिम ट्रेनर म्हणून काम करत असलेल्या ज्योती माने यांना अप्पर पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर बसवून अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सल्युट केला. एक दिवसासाठी का होईना या सर्वोच्चपदी विराजमान होण्याचा मान मिळाल्याने या दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.