दृष्टिहीन विशेष साहित्यिकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संधी देणार – मिलिंद जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दृष्टीहीन व्यक्तींमधील उत्तम साहित्यिकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संधी देऊ,असा विश्वास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी येथे व्यक्त केला.
पुना ब्लाईंड मेन्स असोसिएशन तर्फे आयोजित दृष्टिहीनांच्या साहित्य संमेलनात जोशी बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश शहा,डॉ.अनिल अवचट ,उद्धव कानडे, किशोरभाई व्होरा ,बंडा जोशी, रमेश रेडेकर आदी उपस्थित होते. या संमेलनात राज्यातुन अडीचशे जण सहभागी झाले होते. पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन आणि अमर ज्योती त्रैमासिक यांच्या कार्याचा गौरव करीत जोशी म्हणाले, “अनेक वर्षापासून या दोन्ही संस्था दृष्टीहीनांनच्या साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. महाराष्ट्र साहित्य परिषद पुढील काळात या संमेलनाच्या आयोजनासाठी निश्चितच सहकार्य करेल. महाराष्ट्र साहित्य परिषदेत हे संमेलन आयोजित करता येईल आणि दृष्टीहीनांमधील उत्तम साहित्यिकांना अखिल भारतीय साहित्य संमेलनात संधी देण्यात येईल .चांगल्या साहित्यिकांची पुस्तके ब्रेल लिपीत यावीत यासाठी देखील आपण प्रयत्न करू”.

उपस्थितांचं कौतुक करीत डॉ.अवचट म्हणाले ,”ज्ञानाची दृष्टी तुम्हाला आहे. ही दृष्टी आणखीन विकसित करा. सकारात्मक दृष्टिकोनातून विकास करा”.अमर ज्योती त्रैमासिका विषयी संपादक धनराज पाटील म्हणाले ,”1961 सालापासून दृष्टिहीनांकरीता हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते .राज्यातील सर्व जिल्ह्यात त्याचा वाचक आहे .दृष्टिहीनांना वाचनासाठी ब्रेल लिपितील साहित्य उपलब्ध नाही.ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मासिकाच्या माध्यमातून केला जातो .हडपसर येथील तांत्रिक प्रशिक्षण केंद्र याची छपाई केली जाते.”