पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आजपासून ‘ब्लॉक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते एनएच ४ दरम्यानच्या उर्से खिंडीदरम्यानचे धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी १४ मे ते १७ मे आणि २१ मे ते २३ मे दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी साडेचारच्या वाजेपर्यंत प्रत्येक तासाला १५ मिनिटांकरिता बंद करण्यात येणार आहे. यावेळी एकूण ६ ब्लॉक असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर तळेगाव टोलनाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उर्स खिंड येथील ढिले झालेले दरडीचे दगड काढण्याचे काम १४ मे ते १७ मे आणि २१ मे ते २३ मे दरम्यान करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत या मार्गावर दर तासाला १५ मिनिटांचा ब्लॉक ठेवण्यात आला आहे.

तो ब्लॉक पुढील प्रमाणे असेल

ब्लॉक १- १०.०० ते १०.१५, ब्लॉक २ – ११.०० ते ११.१५, ब्लॉक ३ – १२.०० ते १२.१५, ब्लॉक ४ – २.०० ते २.१५, ब्लॉक ५ – ३.०० ते ३.१५ आणि ब्लॉक ६ – ४.०० ते ४.१५ या दरम्यान १५ मिनिटांचा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे यावेळी द्रुतगती मार्गावर तळेगाव टोलनाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्र ४ कडे जाणाऱ्या वाहनचालकांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन महामार्ग सुरक्षा पथक पोलीस अधिक्षक यांनी केले आहे.