Pune News : संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु, तब्बल 42 ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीसांनी 42 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. रात्री 11 ते पहाटे 6 वाजेदरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. तसेच दिवसभर विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरु आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत ही संचारबंदी राहणार असून यातून अत्यावश्यक सेवेतील नागरिक व कर्मचाऱ्यांना वगळले आहे.

संचारबंदीच्या काळात या 42 ठिकाणी नाकाबंदीच्या ठिकाणावर रस्त्यावरुन फिरणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. उशिरापर्यंत फिरण्याचे कारण जाणून घेतले जात आहे. कोणत्याही कारणाशिवाय फिरणा-यावर कारवाई केली जात आहे. तसेच विनामास्कर फिरणा-यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.

त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात 902 विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 4 लाख 46 हजारांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत शहरात 2 लाख 28 हजार 560 विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून 11 कोटी 6 लाख 6 हजार 700 रुपये दंड वसूल केला आहे.