..तर रस्त्यांवर ‘रक्त’ सांडल्यास त्याला ‘मोदी’ जबाबदार असतील : बिहार महाआघाडीचा इशारा

पाटणा : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुका पार पडल्या असून आता सगळ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. येत्या २३ मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर खऱ्या अर्थाने देशात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. एक्झिट पोलमध्ये मात्र भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असे दिसत असले तरी, विरोधक मात्र आम्हालाच बहुमत मिळणार असे सांगत आहेत.

सत्ताधाऱ्यांविषयी जनतेच्या मनात प्रचंड संतापाची भावना आहे. त्यामुळे सत्ताधारी एनडीएला अनुकूल स्थिती निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत लबाडी केली गेल्यास रस्त्यांवर रक्त सांडेल, असा इशारा बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीने मंगळवारी दिला.

यासाठी मंगळवारी महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यात राजदचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पूर्वे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मदनमोहन झा, रालोसपचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा उपस्थित होते.याचबरोबर छोट्या -मोठ्या मित्रपक्षांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना उपेंद्र कुशवाह म्हणाले कि, निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काहीही करू शकते. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार देखील केला जाऊ शकतो. जर यामुळे काही अनुचित घटना घडली तर त्यासाठी आम्हाला जबाबदार धरू नये, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, एक्‍झिट पोलमध्ये बिहारमधील ४० पैकी ३० जागा एनडीए जिंकेल, असे भाकीत केले आहे. ते दिशाभूल करणारे आहे, असा आरोपही महाआघाडीच्या नेत्यांनी केला.

You might also like