राज्यात रक्ताची कमतरता, शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संसर्गामुळे रक्तदात्यांनी रक्तदानकडे पाठ फिरवली आहे. रक्तदान संयोजकांचा ही रक्तपेढ्यांना प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसभरात रक्तदानासाठी शंभर फोन केल्यानंतर दोन जणांनी रक्तदान केले. कोरोनामुळे लोक रक्तदान करण्यास बाहेर पडत नाही.

दरम्यान, रक्तपेढ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसतं आहे. तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी रक्त संकलित होत नाही. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या मोजक्या बॅग शिल्लक आहेत. परिणामी, राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागत आहे. कोरोनाच्या उद्रेकाचा थेट परिणाम रक्त संकलनावर होत आहे.

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तदान करण्याचं वारंवार आवाहन केलं जात होतं; मात्र त्याला प्रतिसाद मिळला नाही. ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रक्तदानाची व्यवस्था केली; पण तेथे दिवसभरात एकही रक्तदाता आला नाही.

यावेळी पुण्यातील थॅलसेमिया सोसायटीचे सदस्य जतिन तेजपाल म्हणाले, की थॅलेसेमियाच्या रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. मात्र, पुण्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्त मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करावी लागते. रक्तदाता बघावा लागतो

दोन तीन दिवस रक्त घेण्याची प्रक्रिया पुढे – मागे होते.
रक्ताची गरज असणाऱ्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. त्यातल्या त्यात काही शस्त्रक्रिया लगेच होतात. रक्ताची गरज असणाऱ्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली आहे, काही शस्त्रक्रियांमध्ये रुग्णांच्या नाते संबंधित रक्तगटाचा रक्तदाता आणण्याची विनंती केली जाते . याशिवाय शस्त्रक्रिया किंवा उपचार करणे अवघड होते.
डॉ. आनंद चाफेकर, रक्तपेढी प्रमुख, केईएम रुग्णालय

रक्त पिढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला आहे. कारण, सध्या कोरोनामुळे महाविद्यालय बंद आहेत. माहिती तंत्रज्ञान कंपन्या सुरू असल्या तरीही त्यांचे बहुतांशी काम घरातूनच होत आहे. औद्योगिक कारखान्यांमधूनही रक्तदान शिबिर नाहीत. या सर्वांचा परिणाम रक्तसंकलनवर झाला आहे.
डॉ. अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण

तरुणांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. मात्र, दिवाळीची सुट्टी आणि कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेच्या भीतीमुळे रक्तदाते रक्त जाण्यासाठी पुढे येत नाहीत. प्रत्यक्षात आव्हानात्मक काळात रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची गरज आहे. सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्त जाण्याची प्रक्रिया सुरक्षित केली जाते.
शंकर मुगावे, मुख्य समन्वयक, पुणे विभाग रक्तपेढ्या

राज्यातील रक्तसंकलन वर एक नजर…
जानेवारी १,६८,१४४
फेब्रुवारी १,४५,२८९
मार्च १,१०,४३७
एप्रिल ५३,६३०
मे ९१,१३७
जून ९९,६५८
जुलै ६०,७५०
ऑगस्ट ६२,००१
सप्टेंबर ६३,८८८