Nagpur News : ‘त्यांना’ उध्दव ठाकरेंनी सुनावले खडेबोल, म्हणाले – ‘आमच्या धमन्यात विदर्भाचे रक्त, आम्हाला विदर्भ प्रेम कुणी शिकवू नये’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आमचे आजोळ विदर्भातील म्हणजे परतवाड्यातील आहे. त्यामुळे आमच्या धमण्यात विदर्भाचे रक्त वाहत आहे. त्यामुळे विदर्भ बाबतचे प्रेम आम्हाला कोणी शिकवू नये किंवा अपप्रचार देखील करू नये, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहेत. या क्षणापासून विदर्भाच्या विकासाकडे कसलेही दुर्लक्ष होणार नाही. आपणाला एकसंघ आणि सक्षम महाराष्ट्र घडवायचा असल्याचे ते म्हणाले.

आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी नामकरणाला विरोध करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, देशात नागपुरातील प्राणी संग्रहालयासारखा एकही झू नाही. नागपुरात सिंगापूर नंतर नाईट सफारी सुरू केली जाणार आहे. टुरिझम ही एक इंडस्ट्रीज असून त्या दृष्टीने व नंतर विकास करणे ही आमची प्राथमिकता असेल. सुरजागडचा प्रकल्प देखील आम्हाला लवकरच मार्गी लावायचा आहे. या सरकारबाबत विकासासंदर्भातील गैरसमज जाणून-बुजून पसरवला जात आहे. मात्र गोसेखुर्दच्या पाण्यानेच आम्हाला तो धुवून काढायचा आहे. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गचे लोकार्पण 1 मे रोजी करण्याचा आमचा मानस असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.