निळ्या लाटांनी कोकण किनारपट्टी उजळली खरी; मात्र…

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरीतील विविध ठिकाणच्या किनाऱ्यांवर सध्या निळ्या रंगातील चकाकणाऱ्या लाटा हा आकर्षणाचा विषय ठरत आहेत. फ्लोरोसंट लाइटप्रमाणे उजळून निघणाऱ्या या लाटा पर्यटकांसाठी पर्वणी ठरत असल्या तरी समुद्रातील ऑक्सिजन कमी होत असल्याचे हे द्योतक मानले जात आहे.

लाटा उजळून टाकणारे हे जीव म्हणजे प्लवंग असून, त्यांचे शास्त्रीय नाव नॉकटिल्युका (noctiluca) असे आहे. समुद्राच्या पाण्याबरोबर हे सूक्ष्म प्लवंग किनाऱ्यावर येतात आणि एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा प्रकाशमान होतात. या प्राण्यामध्ये जैविक प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते. नॉकटिल्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे. तो काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करतो.

गणपतीपुळे, वरवडे, रिळ या किनाऱ्यावर त्या प्रथम दिसतात. नंतर एक-एक दिवसाच्या अंतराने ते बसणी काळबादेवी व रत्नागिरीच्या मांडवी, भाट्ये किनारी दिसत आहेत.
अचानक नॉकटिल्युका या प्राण्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची कारणे पाहता, समुद्राच्या पाण्यात कमी झालेला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचे वाढलेले प्रमाण, हिमालयीन तिबेटीयन पठारावरील ग्लेशियर्सचे कमी होत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यांवर झालेला परिणाम ही कारणे दिसून येत असल्याचे रत्नागिरीतील मत्स महाविद्यालयातील डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले.