BMC सज्ज ! मुंबईकरांना लसीकरणाचे वेध, दिवसाला 12 हजार लस देण्याचे लक्ष्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुबईकरांना आता कोरोना लसीकरणाचे वेध लागलेत. आपल्याला लस कधी मिळणार याबाबत मुंबईकर आता आपापसात चर्चा करताना दिसत आहेत. दरम्यान मुंबई महापालिका लसीकरणासाठी सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यात दिल्या जाणा-या लसीकरणामध्ये दिवसाला तब्बल 12 हजार नागरिकांना लस देण्याचे टार्गेट महापालिकेने डोळ्यासमोर ठेवले आहे.

आठ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून हे लसीकरण होण्याची शक्यता आहे. तर पहिल्या टप्प्यातील लसीकरण हे 15 दिवसात पूर्ण करण्यावर BMC चा भर असणार आहे. मुंबई महापालिकेकडून या केंद्रांसाठी पायाभूत सुविधा पुरवण्याची काम सध्या सुरु असल्याचे समजते.

आठ केंद्रे कोणती ?
मुंबईकरांना आठ केंद्रांच्या माध्यमातून लस दिली जाणार आहे. यात केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, कूपर रुग्णालय, सायन रुग्णालय, भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आदीचा समावेश आहे. दरम्यान 12 वरून मुंबईतील लसीकरण केंद्रांची संख्या 50 वर नेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

लसीकरणाबाबतचे ठळक मुद्दे
-पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार
-करोनावरील लस पालिकेस उपलब्ध होताच त्यानंतरच्या 24 तासातच प्रत्यक्ष लसीकरण हाती घेतले जाईल.
-दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेमधील इतर घटकांतील कर्मचाऱ्यांच्या समावेश. या टप्प्यात 5 ते 6 लाख नागरिकांना लस देणार
-तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाख मुंबईकरांना लस दिली जाणार आहे. या टप्प्यात जेष्ठ नागरिक आणि लहानग्यांना कोरोनाची लस देण्यावर भर राहणार.