मुंबईत मराठीचे तीन तेरा ! मातृभाषेतून शिक्षण घेतलं म्हणून महानगरपालिकेने नाकारली पात्र उमेदवाराची ‘नोकरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी शाळेत शिकल्या कारणाने मुंबई महानगरपालिकेकडूनच नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 10 वी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी पात्र ठरलेल्या 102 उमेदवारांना डावलण्यात आले. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अजब गजब कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेत आहेत तर दुसरीकडे मराठी माणसाला नोकरी नाकारली जात असल्याने उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक म्हणून निवडल्या गेलेल्या 102 शिक्षकांची नेमणूक रखडली आहे. 2017 साली डिसेंबर महिन्यात शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुंबई महापालिकेच्या इंग्रजी शाळांसाठीही निवड करण्यात आली. मात्र परीक्षेत पात्र ठरलेल्या 102 उमेदवारांचे दहावीचे शालेय शिक्षण मराठीत असल्याने त्यांची इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून नेमणूक करता येणार नाही असे अजब कारण शिक्षण विभागाकडून देण्यात आले.

असे असले तरी या 102 शिक्षकांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून घेणे हे राष्ट्रीय धोरणानुसार आणि कायद्यानुसार मान्य करण्यात आले आहे. हा प्रत्येक नागरिकांचा आधिकार आहे. परंतु प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मातृभाषेत घेतल्या कारणाने नोकरी नाकारली जात असेल तर ही बाब चिंताजनक आहे.

याउलट ज्या उमेदवारांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे त्यांची तात्काळ नेमणूक करण्यात आली. त्यामुळे मराठी माणसाची मुंबई म्हणणाऱ्यांनी मराठीचा गळा आवळण्यास सुरुवात केली की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा