Mumbai News : क्वारंटाइन न करण्यासाठी लाच घेणाऱ्या पालिका अभियंत्यासह तिघांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परदेशातून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहण्याचे शासनाचे आदेश आहे. असे असतानाही विलगीकरणात सूट देण्यासाठी लाच घेणाऱ्या दुय्यम अभियंत्याला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ निलंबित केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

महापालिका प्रशासनाने तीन जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्या प्रवाशांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर कर्तव्यावर नेमलेल्या पालिकेचा दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) दिनेश गावंडे हा विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना चुकीच्या व अवैध पद्धतीने क्वारंटाईनमध्ये सूट देत असल्याचे तसेच त्याला दोन जण मदत करत असल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) यांना समजली.

हा प्रकार त्यांनी रात्रपाळीवर असलेल्या पालिकेच्या एच/पश्चिम विभागातील कार्यकारी अभियंता वकार जावेद हाफिझ यांच्या निदर्शनास आणून दिला. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत हाफिझ यांनी दिनेश गावंडे यांच्याकडे विचारणा केली. सीआयएसएफच्या मदतीने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून बनावट शिक्के व रोख रक्कम जप्त करण्यात आली. यामध्ये अस्थापनाचे दोन संशयित आढळून आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात पालिकेने गावंडे याच्यासह दोघांविरोधात सहारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गावंडेसह तिघा संशयितांना अटक केली आहे.