पडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर

पोलिसनामा ऑनलाईन – चैत्यभूमीच्या वास्तूमध्ये पडझड होत असून दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चैत्यभूमीच्या पुनर्बाधणीसाठी वास्तुविशारदाची नियुक्ती करून एक वर्ष होत आले. मात्र पुनर्बाधणी वा दुरुस्तीबाबत कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. ही वास्तू धोकादायक बनू लागल्याने तेथे वास्तव्यास असलेल्या भंतेजींना स्थलांतर करण्याची सूचना पालिकेकडून करण्यात आली आहे.

चैत्यभूमीबाबत योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्याचे साकडे मुंबई महापालिकेने राज्य सरकारला घातले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये चैत्यभूमीची मोठया प्रमाणावर दुरुस्तीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे भिंती आणि छपराच्या सिमेंटच्या गिलाव्याची पडझड होऊ लागली आहे. ही एक मजली वास्तू समुद्रकिनार्‍यालगत आहे. खार्‍या हवेमुळे वास्तूच्या बांधकामात वापरलेल्या लोखंडी सळया गंजल्या आहेत. परिणामी चैत्यभूमीची दुरुस्ती वा पुनर्बाधणीबाबत निर्णय घेणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. पुरातन वारसा वास्तू श्रेणी ‘अ’ आणि पर्यटनस्थळ ‘अ’ श्रेणीमध्ये चैत्यभूमीचा समावेश आहे. त्यामुळे ही वास्तू जनत करणे आवश्यक आहे. ही वास्तू भारतीय बौद्ध महासभेच्या अखत्यारीत असून वास्तूचा प्रत्यक्ष ताबा भीमराव आंबेडकर यांच्याकडे आहे. चैत्यभूमीच्या पुनर्बाधणीबाबत भीमराव आंबेडकर आणि पालिका अधिकार्‍यांमध्ये 5 ऑक्टोबर 2019 रोजी चर्चा झाली होती. या वास्तूचे संरचनात्मक परीक्षण करण्यात यावे असे त्यांना कळविण्यात आले होते, असे या पत्रात म्हटले आहे.