मुंबईत घराबाहेर पडताना ‘मास्क’ घालणं ‘बंधनकारक’, अन्यथा होणार ‘गुन्हा’ दाखल

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे मुंबई महापालिकेने काही कठोर पावलं उचलली आहेत. शहरात मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. घरातूनकोणत्याही कारणांनी बाहेर पडणाऱ्यांनी मास्क न वापरल्यास त्यांच्यावर भा.दं.वि कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये यासाठी हा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. कारण, मुंबईत अनेक हॉटस्पॉट तयार करण्यात आले आहेत.

काही अभ्यासातून समोर आले आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर मास्क वापणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर गरजेचा असल्याचे मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हणले आहे. साथीचा रोग कायदा 1897 अंतर्गत मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत. यासह सोशल डिस्टन्सिंग देखील महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले.

वैयक्तिक कारण असो वा कार्यालयीन कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणार असाल तर मास्क घालणे बंधनकारक आहे. रस्त्याने चालताना, रुग्णालयात अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय वाहन चालवताना, सरकारी बैठकांमध्ये देखील मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.

याआधी चंदीगडमध्ये देखील मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. ओडिसा राज्याने देखील सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे –
करोनाचा धोका पाहता आपल्याला अधिक सावध राहण्याची गरज आहे. घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. केवळ आताच नाही, हे संकट दूर झाल्यानंतर देखील पुढील काही दिवस हे करावे लागेल. त्यासाठी दुकानातच जायला पाहिजे असे नाही. हा मास्क घरातीलच चांगल्या कापडाच्या दोन – तीन घड्या करुनही बनवात येईल. स्वच्छ धुवून तो पुन्हा वापरता येईल. मात्र, या मास्कचा वापर छत्रीसारखा करु नका. बाहेर जाताना एखाद्या छत्रीसारखा उचलला मास्क आणि निघालात असे करु नका. प्रत्येकाने स्वत:चाच मास्क वापरायचा आहे. स्वच्छ गरम पाण्याने धुवून, सुकवून वापरा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.