Coronavirus : ‘कोरोना’विरुद्ध लढणार्‍यासाठी मुंबईच्या महापौरांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाविरुद्ध लढणार्‍या बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या योद्धा अर्थात कर्मचार्‍यांबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या महामारीत कर्तव्य बजावताना महानगरपालिकेच्या एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कटुंबातील एका सदस्याला तत्काळ नोकरी देण्यात येईल. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य सरकारद्वारा घोषित करण्यात आलेल्या 50 लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळेल, अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.

कोरोनाशी लढा देताना प्राण गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पोलिस खात्यातील योद्धांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ही घोषणा केली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत 107 पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 17 अधिकार्‍यांचा, तर 90 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनाविरुद्ध लढा देताना दोन पोलिस कर्मचार्‍यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मुंबई पोलिसांच्या दोघा कर्मचार्‍यांनी कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या युद्धात बलिदान दिले आहे. सरकार दोन्ही कुटुंबियांसोबत आहे. दोन्ही परिवारांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात येईल असे देशमुख यांनी सांगितले.