मुंबईतील Lockdown बाबतचा ‘तो’ मेसेज खोटा; BMC प्रशासनाचं स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात लॉकडाऊनसदृश्य अनेक निर्बंध लागू आहेत. 30 एप्रिलपर्यंत असणारे निर्बंध आता 15 मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. पण सध्या मुंबई महापालिकेने लॉकडाऊन संदर्भात नवीन नियमावली जारी केल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबईत उद्यापासून म्हणजेच 1 मे पासून संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. हाच मेसेज सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही बाब पालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ट्विटरवरून यावर स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये म्हटले की, ‘सोशल मीडियावर प्रसारित होत असलेली ही माहिती खोटी असून, मुंबई महापालिका प्रशासनाने असे कुठलेही नियम जाहीर केलेले नाहीत. राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्वेच मुंबईतही लागू असतील, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पसरवूही नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

काय लिहिलंय त्या मेसेजमध्ये?

मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येत आहे. 1 मे पासून नव्या गाइडलाइन्स लागू असतील, अशा शिर्षकाखाली मुंबई महापालिकेचा लोगो.

–  गॅस एजन्सी दररोज सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार

–  स्टेशनरी शॉप मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार

–  औषध दुकाने सर्व दिवस 24 तास सुरू राहणार

–  किराणा दुकाने आणि दूध विक्री केंद्रे सर्व दिवस सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार

–  चपला आणि कपड्यांची दुकाने सोमवार आणि गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत खुली राहणार

–  जनरल स्टोअर्स मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार

–  घाऊक भाजी बाजार सर्व दिवस सकाळी 5 चे सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहणार

या अशा आशयाचा मेसेज फिरत आहे. हा पूर्ण मेसेज फेक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले असून FAKE असा शिक्काही त्यावर मारण्यात आला आहे.