…तर सोसायटीच सील करणार; मुंबईच्या महापौरांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यासह मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णसंख्या जास्त आहे. त्यामुळे आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका बिल्डींगमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळले तर ती सोसायटी सील केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

महापौर पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी कोरोनाविषयक अनेक सूचना मुंबईकरांना केल्या आहेत. त्या म्हणाल्या, मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. झोपडपट्टी आणि चाळ परिसरात रुग्णांची संख्या वाढत आहे. याशिवाय उच्चभ्रु वस्तीतही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक रुग्ण सापडल्यास रहिवासी सोसायटी सील केली जाणार आहे. तसेच मुंबईतील नाईट कर्फ्यूदरम्यान हॉटेल्स व पब बंद राहणार आहेत व फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी मुंबईत 10 किंवा 11 पर्यंत नाईट कर्फ्यू सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. पण आता मुंबईकरांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.