मुंबईतील दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याचा अमेरिकेत प्रबंध सादर

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन
मुंबई महापालिकेतील उच्चशिक्षित सफाई कर्मचारी सुनील यादव याने केवळ मुंबईकरांनाच नाही तर संपूर्ण भारतीयांना आभिमान वाटावा अशी गोष्ट करुन दाखवली आहे.सुनील यादव या 36 वर्षीय व्यक्तीने कोलंबिया विद्यापीठात ‘ह्युमिलिएशन बाय बर्थ : अ केस ऑफ स्केव्हेंजिंग/क्लीनिंग इन इंडिया’ या विषयावर प्रबंध सादर केला. सुनील यादव हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये एम.फिल-पीएचडीचे विद्यार्थी असून बीएमसीच्या कचरा व्यवस्थापन विभागातील कायमस्वरुपी कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे दहावीत नापास झालेल्या सुनीलकडे आता सात पदव्या आहेत.

‘भारतातील सफाई कर्मचाऱ्यांची स्थिती’ हा त्यांच्या डेझर्टेशनचा विषय होता. याबद्दल सांगताना ते म्हणाले,” सफाई कर्मचारी म्हणून जन्मपासून सहन करावी लागणारी अवहेलना हा माझ्या अभ्यासाचा मुख्य गाभा होता. अवहेलना आणि अधोगती या मधील भिन्नता, तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा होणारा तिरस्कार, ज्यामुळे त्याच्या/तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचते, यावर मी बोललो,” तसेच ‘आंबेडकांचा अखंडित वारसा’ यावरील विश्लेषण मांडण्यासाठी त्यांना बोस्टनला आमंत्रित करण्यात आले होते .तसेच एक-दोन महिन्याच्या संशोधणातून बनवलेला हा प्रबंध नाही तर माझ्या आयुष्यातील अनुभवांचा हा निष्कर्ष आहे असे ते म्हणाले. 15 देशांमधील 50 स्कॉलर्सना त्यांचा प्रबंध सादर करण्यासाठी बोस्टनला आमंत्रित करण्यात आले होते. या 15 जणांमध्ये सुनील यादव यांचा समावेश होता. पण बोस्टनला पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. नोकरशाहीचा अडथळा पार करत ते बोस्टनला पोहोचले. बीएमसीकडून ना हरकत प्रमाणपत्र उशिरा मिळाल्याने त्यांना व्हिसा मिळवण्यासाठी अडचणी आल्या होत्या. सुनील यादव यांनी 5 मे रोजी प्रेझेन्टेशन सादर केले. आता ते अमेरिकेत शैक्षणिक दौऱ्यावर आहे.