CBSE बोर्डाचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी ची परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशातच मे महिन्यात होणाऱ्या CBSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षाकडून होत होती. त्यानुसार अखेर मंगळवारी (दि. 14) CBSE बोर्डाने परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. बोर्डाने 10 ची परीक्षा रद्द करण्याचा तर 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

 

 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CBSE बोर्ड परीक्षांच्या संदर्भात बुधवारी (दि. 14) दुपारी 12 वाजता बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, CBSE चे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत CBSE च्या 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि 10 वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. CBSE बोर्डाच्या लेखी परीक्षेला 4 मे पासून सुरुवात होणार होती. सध्या देशात दररोज 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा रद्द करा, अशी मागणी सोशल मीडियावर केली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या या मागणीला अभिनेता सोनू सूद, गायक अरमान मलिक, काँग्रेस नेते राहूल गांधी, प्रियांका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परीक्षा रद्द करावी किंवा दुसरा मार्ग काढावा अशी मागणी केली होती. त्यानुसार, पंतप्रधान मोदी यांनी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर CBSE बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा तर 10 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.