8500 रुपयांची लाच स्विकारताना मंडळ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – गेवराई तालुक्यातील रेवती मंडळ अधिकाऱ्याला 8 हजार 500 रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. मंडळ अधिकाऱ्याने 8 अ वरील नाव कमी करण्यासाठी तक्रारदाराकडे लाचे मागणी करून लाच स्विकारली. श्रीधर भगवानराव साळुंके (वय-53) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी 8 अ वरील नाव कमी करण्यासाठी अर्ज केला होता. नाव कमी करण्यासाठी साळुंके याने तक्रारदाराकडे 8 हजार 500 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने बुधवारी (दि. 4) बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता साळुंके याने लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केले. आज गेवराई येथील तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तहसिल परिसरातील वडाच्या झाडाखाली लाचेची रक्कम स्विकारताना श्रीधर साळुंके याला रंगेहाथ पकडण्यात आले. साळुंके याच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक हनपुडे पाटील यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –