सांगलीच्या पूरात बोट उलटून १६ जणांचा मृत्यू, शोधकार्य सुरु

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगलीत महापूराने हाहाकार माजवला आहे. ब्रह्मनाळ येथे याच भीषण पुरात अडकलेल्या ३२ नागरिकांना बाहेर काढत असताना बचावकार्यासाठी गेलेली एक बोट उलटली. ही बोट उलटल्याने तब्बल १६ जणांना जलसमाधी मिळाली. त्यात ९ जणांचे मृतदेह सापडले असून इतर १४ जणांसाठी शोधकार्य सुरु आहे.

मृतांची नावे
यात मृत्यू झालेल्या काहींची नावे समोर आली आहेत. यात कल्पना रवींद्र कारंडे, कस्तुरी बाळासो वडेर, पप्पू ताई भाऊसो पाटील, लक्ष्मी जयपाल वडेर, राजमाती जयपाल चौगुले, बाबासो अण्णासो पाटील, अनोळखी इसम, मयत एक लहान मुल यांचा समावेश आहे. या अपघातात आधिकतर महिलांचा मृत्यू झाल्याची शंका वर्तवण्यात येत आहे.

ब्रह्मनाळ येथे कृष्णा आणि येरळा नदीचा संगम होतो. सध्या कृष्णा नदीला महापूर आला असून ब्रह्मनाळ येथे नदीचे पाणी पात्र सोडून वाहत आहे. संपूर्ण ब्रह्मनाळ गावाला महापुराच्या पाण्याने वेढा दिला असून, गावात मागील ३ दिवसांपासून पाणी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. या दुर्घटनेनंंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळाकडे रवाना झाले.

गावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. गुरुवारी सकाळी म्हणजे आज ग्रामपंचायतीच्या बोटीतून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत होते. परंतू बोटीच्या क्षमतेपेक्षा आधिक माणसे बसल्याने बोट उलटली, या बोटीचा पंखा एका पाइपमध्ये आणि झाडात अडकला होता. बोटीतील वजन आणि पंखा अडकल्याने बोट जागीच उलटली. क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ३२ जण बसले होते. मृतांमध्ये महिलांचा समावेश अधिक असल्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त