पुण्यात पोलीस चौकीच्या शेजारी मृतदेह तासभर पडून, ‘कोरोना’च्या भीतीनं कोणी हातही लावेना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील महर्षीनगर पोलीस चौकीच्या शेजारीच फुटपाथवर एका तरुणाचा मृतदेह गेल्या एक तासापासून पडून असल्याने खळबळ माजली आहे. कोरोना असण्याच्या भीतीने मृतदेह उचलण्यास कोणीच पुढे येत नसल्याचे सांगितले जात आहे. रुग्णवाहिका येऊन गेली पण तीही परत गेल्याचे सांगितले जात आहे.

स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत महर्षीनगर पोलीस चौकी आहे. दरम्यान मृतदेह एका सुरक्षा रक्षकाचा असल्याची माहिती सांगितली जात आहे. चौकीच्या शेजारीच फुटपाथवर एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेऊन रुग्णवाहिकेला याची माहिती देण्यात आली. रुग्णवाहिका त्याठिकाणी आली. परंतु, त्या कर्मचाऱ्यांनी हा कोठून आला आहे. त्यावेळी या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे ते देखील तेथून परत गेले, अशी माहिती स्थानिक नागरिकाकडून मिळाली आहे.

दरम्यान कोरोना झाला असण्याच्या शक्यतेनेच त्याला कोणी हात लावत नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या सर्व गोंधळात मात्र गेल्या एक तासापासून मृतदेह फुटपाथवर पडून राहिला असल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. स्वारगेट पोलिसांनी घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठांना आणि वैद्यकीय यंत्रणेला कळविली असून त्याचा मृतदेह तेथून हलवण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.