माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या, मृतदेह ठेवले पलंगात लपवून

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माजी मंत्री दिवंगत डी. पी. घृतलहरे यांची सून आणि 9 वर्षाची नात यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. खम्हारडीह येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. हत्या करून आरोपीनी दोन्ही मृतदेह घरातील पलंगामध्ये लपवून ठेवले. या प्रकरणी पोलिसांनी एका नातेवाइकासह दोघांना अटक केली आहे. दुहेरी हत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

नेहा तरुण घृतलहरे (वय 30) आणि अनन्या तरुण घृतलहरे (वय 9) असे हत्या झालेल्या आई व मुलीचे नाव आहे. नेहाच्या घरच्यांनी तिच्या पतीवर कट करुन हत्येचा आरोप केला आहे. दिवंगत डी. पी. घृतलहरे हे अजित जोगी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये 2000 ते 2003 पर्यंत मंत्री होते.

मिळालेल्या माहितीनुसार, घृतलहरे हे कुटुंब छत्तीसगडमधील खम्हारडीह भागातील सतनाम चौकात शंकर नगरमध्ये राहत होते. नेहा आणि अनन्या यांची हत्या शनिवारी सायंकाळी झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. मृत नेहा ही तरुण घृतलहरे यांची पत्नी आहे. तरुण हा दिवंगत डी. पी. घृतलहरे यांचा मुलगा आहे. नेहाच्या माहेरच्यांनी पोलिसांना तिचा फोन लागत नसल्याचेही सांगितले. फोन लागत नसल्याने नेहाच्या घरापासून जवळच राहणारी तिची बहिण मेघा तिची विचारपूस करायला गेली. त्यावेळी मेघाला बहिणीच्या घराचा दरवाजा बंद आढळला आणि नेहाची स्कुटी, चप्पल घराबाहेर होती. यानंतर मेघाने तातडीने तिच्या भावाला फोन केला. भाऊ आकाशने याबाबत पोलिसांना माहिती दिली.