नंदीग्राममध्ये घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला BJP कार्यकर्त्याचा मृतदेह

नंदीग्राम : पोलीसनामा ऑनलाइन –  सध्या पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. बंगालमध्ये ३० तर आसाममध्ये ३९ जागांसाठी मतदान होत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर मतदारांना धमकावल्याचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये गुरुवारी एका भाजपा कार्यकर्ता घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. हाय प्रोफाइल सीटसाठी सुरु असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी नंदीग्रामच्या भेकुटिया भागात उदय दुबे हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. भाजपा नेते शुभेंद्रू अधिकारी यांच्या समर्थनार्थ या परिसरात प्रचार करणारे सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांनी रोड शोमध्ये भाग घेतल्यानंतर दुबे यांना ३० मार्चपासून तृणमूल कॉंग्रेसकडून धमक्या मिळत होत्या, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला. टीएमसीच्या गुंडांनी त्याची गळफास लावून हत्या केली असावी असा आरोप त्यांनी केला. टीएमसीने हे आरोप फेटाळून लावत मृत्यूवरुन राजकारण केल्याबद्दल भाजपावर निशाणा साधला. टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने असा दावा केला आहे की, “कौटुंबिक समस्येमुळे दुबे यांनी आत्महत्या केली.”

“अपमृत्यूचा मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळू शकेल. पोलिस पुढे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी केंद्रीय सैन्याने तैनात केली आहे. नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे माजी सहयोगी आणि भाजपाचे उमेदवार शुभेंद्रू अधिकारी यांच्यात राजकीय स्पर्धा आहे, त्यानुसार येथे कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू आहे.” असं ही पोलिसांनी यावेळी सांगितलं.