मुंबईला पोहोचले पंडित जसराज यांचे पार्थिव, अंत्यसंस्कारात दिली जाईल 21 तोफांची सलामी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक पंडित जसराज यांचे पार्थिव बुधवारी अमेरिकेतील न्यू जर्सीहून मुंबईला पोहोचले आहे. संगीताच्या मेवाती घराण्याशी संबंधित असलेले पंडित जसराज यांची हृदय गती थांबल्याने अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे सोमवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गुरुवारी मुंबईतच पंडित जसराज यांचे अंत्यसंस्कार केले जातील.

कोरोना विषाणू महामारीमुळे जेव्हा भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आला, तेव्हा ते अमेरिकेत होते. त्यांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी पंडित जसराज यांचे पार्थिव वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी ‘अंतिम दर्शना’साठी ठेवले जाईल, असे कुटुंबातील माध्यम समन्वयक प्रतिम शर्मा यांनी सांगितले. विलेपार्लेच्या पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य सन्मानाने केले जातील अंत्यसंस्कार
शर्मा यांनी सांगितले की, त्यांचे अंत्यसंस्कार राज्य सन्मानाने केले जातील आणि २१ तोफांची सलामी दिली जाईल. पंडित जसराज यांच्या कुटुंबात पत्नी मधुरा, मुलगा सारंग देव पंडित आणि मुलगी दुर्गा जसराज आहेत. मुलगा आणि मुलगी दोघेही संगीतकार आहेत.

सोनिया गांधींनी वाहिली श्रद्धांजली
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नीला पत्र लिहून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि म्हटले की, त्यांनी आयुष्यभर भारताचा गौरव केला. पंडित जसराज यांची पत्नी मधुरा यांना पाठवलेल्या शोक संदेशात त्यांनी म्हटले, “पंडित जसराज यांच्या निधनाने उत्कृष्ट सौम्यता आणि अध्यात्माचा एक आवाज गमावला. माझ्यासह कोट्यावधी संगीत प्रेमींसाठी निराशा झाली.”

त्यांनी म्हटले, “पंडित जसराज यांचे आपण यासाठी आभार मानले पाहिजे की, त्यांनी आयुष्यभर आपला देश आणि आपली संस्कृती अभिमानित केली. आज आपल्याकडे त्यांच्या संगीताचा समृद्ध वारसा आहे.”