दगडाने ठेचून खून करत युवकाचा मृतदेह जाळला

खेड (सातारा) : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा शहर उपनगर परिसरात एका युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. या खुनाच्या उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मंदार उर्फ बबलू प्रदीप नगरकर (वय-३० सध्या रा. लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, सदर बझार, सातारा) असे खून झालेल्या युवाकाचे नाव आहे. याप्रकरणात तिघांना अटक केली आहे तर दोन अल्पवयीनही ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली होती.

आरोपींनी डोके, तोंड दगडाने ठेचून खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळला होता. बॉडीबिल्डींगच्या स्पर्धा पाहताना झालेल्या किरकोळ वादातून त्याचे अपहरण करुन खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपींनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेनंतर सहा तासात अटक केली.

अमीर इम्तियाज मुजावर (वय -20), अनुप इंद्रपाल कुरेल (वय -19) व अनिकेत बाळासाहेब माने (वय -20, तिघे रा. पिरवाडी, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे असून, आणखी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोमवारी सकाळी सातार्‍यालगत महालक्ष्मीनगर येथे युवकाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांनी सुरुवातीला मृत युवकाची ओळख पटवण्याचे काम सुरु केले. घटनास्थळी सापडलेल्या वस्तू व मृतदेहाच्या हातातावरील जन्मखूनावरुन सकाळी साडेअकराच्या सुमारास मृतदेहाची ओळख पटली. ओखळ पटल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी चार पथके तयार केली.

बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात रविवारी रात्री बॉडी बिल्डींगच्या स्पर्धा असल्याने पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केली. त्यावळी मंदार हा बॉडी बिल्डींगच्या स्पर्धा पाहण्यासाठी आला असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी काही जणांकडे चौकशी केली असता मंदार याचे काही जणांसोबत वाद झाल्याचे समोर आले. पोलिसांनी याचा तपास करुन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोलिस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक विजय कुंभार, प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पोरे, बाजीराव ढेकळे, फौजदार प्रसन्‍न जर्‍हाड, पोलिस हवालदार विजय शिर्के, उत्तम दबडे, आनंदराव भोईटे, कांतीलाल नवघणे, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नितीन गोगावले, विशाल पवार, गणेश कचरे यांनी केली.