Nashik News : लॉजमध्ये बॉईसरच्या तरुणीचा आढळला मृतदेह, संशयित प्रियकर पोलिसांच्या ताब्यात, प्रचंड खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकमध्ये एका हॉटेलच्या खोलीत 21 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. बुधवारी (दि.13) संध्याकाळी ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. मृत तरुणी ठाण्यातील बोईसर येथील असल्याचे समजते. यावेळी तिच्यासोबत हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या संशयित प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अर्चना सुरेश भोईर (20,रा. कल्लाले मान, बोईसर) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तन्मय प्रवीण धानवा (21 रा.मासवन, कोळीपाडा, पालघर) याला ताब्यात घेतले आहे. युवतीचा तोंड दाबून खुन केल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी वर्तविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या सीबीएस सिग्नलजवळील एका हॉटेलच्या रुममध्ये मंगळवारी दुपारी संशयित प्रियकर तन्मय आणि मृत अर्चना हे प्रेमीयुगल हॉटेलमधील खोली क्रमांक 203 मध्ये मुक्कामी आले होते. दरम्यान बुधवारी दुपारी 12 वाजच्या सुमारास खोलीतील पलंगावर अर्चना मृतावस्थेत आढळून आली व तन्मय येथील एका कोपऱ्यात बसलेला होता. याबाबत हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळेतच सरकारवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्चनाला तपासून बघितले असता ती मयत झाल्याची खात्री पटली. यावेळी पोलिसांनी तिच्यासोबत थांबलेल्या तन्मयला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रथमदर्शनी अर्चनाचा तोंड दाबल्यामुळे मृत्यु झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रेयसीच्या खूनाच्या संशयावरुन संशयित प्रियकर तन्मय यास पोलिसांनी अटक केली आहे. मयत अर्चनाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.