बोगस बिल्डरांचा धोनीला ही फटका

रांची : वृत्तसंस्था

टीम इंडियाचा नावाजलेला क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या झारखंड मधील दोन फ्लॅट्सचा आता लिलाव होणार असल्याची बातमी समोर आली आहे. इमारतीच्या बिल्डरला कर्ज चुकवता न आल्याने हे फ्लॅट्स लिलावात काढण्याची वेळ आली आहे. ‘हुडको’ (हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) हा लिलाव करणार आहे.

याबाबत मिळाली अधिक माहिती अशी की, रांची येथील डोरंडा भागात हॉटेल युवराजजवळ ‘शिवम प्लाझा’ नावाची इमारत आहे. या इमारतीत महेंद्रसिंग धोनीच्या नावे अकराशे आणि नऊशे चौरस फूट क्षेत्राचे फ्लॅट्स आहेत. हि इमारत बांधलेल्या बिल्डर दुर्गा डेव्हलपर्सने हुडकोचे सहा कोटी रुपयांचे कर्ज चुकते केले नाही. त्यामुळे पूर्ण प्रकल्पासाठी लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे धोनीलाही याची झळ सोसावी लागत आहे.

धोनीचे फ्लॅट्स असलेल्या शिवम प्लाझा या इमारतीच्या लिलावाची तयारी आता सुरु करण्यात आली आहे. याप्रकारणी लिलावाची आधार किंमत निश्चित करण्याच्या सूचना देखील अलाहाबादमधील कर्ज वसुली न्यायाधिकरणाने दिल्या आहेत. या लिलावातून मिळालेली रक्कम हुडको या कंपनीच्या खात्यात जमा होणार असून यात धोनीच्या फ्लॅट बरोबरच विक्री झालेल्या फ्लॅट्सचा देखील समावेश करण्यात येणार आहे.

शिवम प्लाझासाठी दुर्गा डेव्हलपर ने हुडको कडून तब्ब्ल १२ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. जमीन मालकाचा आणि दुर्गा डेव्हलपर्स यांच्यात वाद झाला . त्यामुळे हुडको कडून फक्त ६ कोटींचेच कर्ज देण्यात आले. त्यानंतर हुडकोने उर्वरित कर्जाची रक्कम देणे थांबवले . आता रक्कमच थांबल्यानंतर सहा मजल्यानंतरचे बांधकाम देखील थांबले. कर्जाची रक्कम चुकती करण्यास उशीर केल्यामुळे हुडकोने ‘दुर्गा डेव्हलपर्स’ चा समावेश काळ्या यादीत केला.

धोनीने शिवम प्लाझा मध्ये तीन मजल्यांवर फ्लॅट खरेदी केले होते. त्यापैकी दोन मजल्यांवरील फ्लॅट्स दुसऱ्या प्रकल्पात हस्तांतरित करण्यात आले आहेत. तर तळ मजल्यावरील दोन फ्लॅट्ससाठी धोनीने दीड कोटी रुपये मोजले आहेत. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.