सावधान ! खरीप हंगामाच्या तोंडावर ‘बोगस’ बियाणांचा बाजारात ‘सुळसुळाट’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना राज्यात बाजारात बोगस बियाणे विकणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी नेममेल्या भरारी पथकांनी धाडी टाकत कोट्यवधींचे बियाणे जप्त केले आहे. त्यात जास्तीत जास्त बोगस बियाणे मराठवाडा आणि विदर्भात सापडले आहे.

खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक
राज्यात खरीपाचा हंगाम सुरु होणार आहे. मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले आहेत. तर काही शेतकरी अजून बियाणे खरेदी करत आहेत. त्यात मराठावाडा विदर्भातील शेतकरी दुष्काळामुळे हैराण आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फसविणाऱ्या बोगस बियाणे विकणाऱ्यांच्या टोळ्यांनी थैमान घातले असल्याने खळबळ उडाली आहे.

एकट्या विदर्भात कोट्यवधींचे बोगस बियाणे
एकट्या विदर्भातील नागपूर विदर्भात पथकांनी १ कोटीपेक्षा जास्त किंमतीचे बोगस बियाणे जप्त केले आहे. तर अमरावतीमध्ये १ लाख ७८ हजारांचे बोगस बियाणे पकडले आहे.

बोगस बियाण्यांचं कनेक्शन परराज्यांमध्ये
बोगस बियाण्यांवर केलेल्या कारवाईत पथकांनी कोट्यवधीचे बियाणे जप्त केले आहे. त्यात बोगस बियाण्यांचं कनेक्शन मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजराजमध्ये असल्याचे समोर आले आहे.

बियाणांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अपूरी ?
बियाणांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच अपूरी असल्याचे समोर येत आहे. स्थापन केलेल्या भरारी पथकांनाही कर्मचाऱ्यांच्या मर्यादा आहेत. कृषि विभागाकडून भरारी पथकं स्थापन करूनही दरवर्षी बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांना फसविले जात आहे.