पैसे वाटल्या प्रकरणी आमिर खानने केला खुलासा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमिर खानने पिठाच्या पिशवीतून 15 हजार रुपये वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यापार्श्वभूमीवर आमिर खानने ट्वीट करुन पैसे वाटले नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे पैसे वाटप केल्याप्रकरणी सुरु असलेल्या चर्चेला आता विराम मिळाला आहे.

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी पुढाकार घेत असून आर्थिक मदत देत आहेत. अशातच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओत आमिर खानने पिठाच्या पिशवीतून 15 हजार रुपये वाटल्याचा दावा कऱण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियावर आमिर खानची चर्चा सुरु झाली होती. त्याविषयी आमिर खानने स्वत: ट्विट करुन यासंबंधी खुलासा केला आहे. पिठाच्या पिशवीत पैसे टाकून वाटणारी ती व्यक्ती आपण नाही. एकतर ही पूर्णपणे खोटी बातमी असावी किंवा दुसरा कोणीतरी रॉबिनहूड असावा ज्याला आपली ओळख जाहीर करण्याची इच्छा नाही असेही म्हटले आहे.

https://twitter.com/aamir_khan/status/1257165603678240768

दिल्लीमधील एका गरीब वस्तीत मध्यरात्री एक ट्रक आला. या ट्रकमध्ये एक-एक किलो पिठाच्या पिशव्या होत्या. ज्या लोकांना पिठाची गरज आहे त्यांनी ट्रकजवळ यावे आणि पीठ घेऊन जावे अशी घोषणा करण्यात आली. परंतु एका कुटुंबाला केवळ एकच पिशवी मिळणार होती. ही पिशवी जेव्हा उघडून पाहिली तेव्हा त्यात 15 हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. अशी अनोखी शक्कल लढवून कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता आमिरने लोकांची मदत केली आहे. असा दावा या व्हिडीओमधील व्यक्तीने केला होता. आमिर खानने खुलासा केला असल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.