#MeToo : अभिनेत्री तनुश्री दत्‍ता आणि नाना पाटेकर, आरोप प्रकरणाची मोठी बातमी ; घ्या जाणून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर बॉलिवूड अॅक्ट्रेस तनुश्री दत्ताने गैरवर्तणुकीचे आरोप लावले होते. परंतु आता नाना पाटेकर यांच्याविरोधात पोलिसांना कोणताही पुरावा समोर आल्याचे आढळले नाही. या गुन्ह्यात काहीही तथ्य नाही असा अहवाल पोलिसांनी अंधेरी न्यायालयात सादर केला आहे. पोलिसांकडून सादर झालेल्या अहवालाची न्यायालयाने पूर्ण तपासणी करून या प्रकरणी अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. कोणतेही विरोधातील पुरावे समोर न आल्याने मीटू प्रकरणातून नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय सांगतो अहवाल ?
अहवालात सांगण्यात आले आहे की, तनुश्रीने नानांवर खोटा खटला दाखल केला आहे. पुराव्याअभावी हा खटला खोटा खटला आहे असे अहवालात म्हटलं आहे. पोलिसांनी न्यायालयात जो अहवाल सादर केला आहे तो अहवाल म्हणजे बी समरी आहे. समरीचे एकूण तीन प्रकार आहेत. ए समरी, बी समरी आणि सी समरी. ए समरी म्हणजे संबंधित प्रकरणाचाच पुरावा नाही, बी समरी म्हणजे खोटा खटला आणि सी समरीमध्ये एखाद्यावर चुकीचा गु्न्हा दाखल केल्याबाबतचा तपशील असतो. अशा प्रकारच्या समरी पोलिसांकडून न्यायालयात सादर केल्या जातात. पुरावा नसल्याने हा खटला खोटा आहे असे सांगत पोलिसांनी तनुश्री आणि नानांच्या प्रकरणात बी समरी दाखल केली आहे.

अशी आहे पुढील प्रक्रिया ?
सध्याच्या घडीला नाना पाटेकरांविरोधात कोणताही पुरावा नसल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी या अहवालानंतरही तनुश्री दत्तालाही एक संधी देण्यात येणार आहे. या सगळ्यावर तिचं काय मत असेल तेही विचारात घेतलं जाणार आहे. तिच्या प्रतिक्रियेनंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की, जर न्यायालयाने आदेश दिले तर या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा केला जाऊ शकतो. परंतु सध्या तरी नानांविरोधात पुरावे नाहीत हे मात्र स्पष्ट आहे.